*देहरंगाच्या सांजधारा ------*

    आमची जातकुळी भटक्याची. चरितार्थासाठी नोकरीची झूल पांघरतो. आजूबाजूला दिसणारे गडकोट बऱ्याच वेळा साद घालतात, खुणावतात पण मनात आलेली अनिवार इच्छा मनातच दाबली जाते. आजूबाजूला चाललेला अस्मितांचा आक्रोश, अहंकाराच्या दंभातून उठलेला उग्र दर्प, सत्तेसाठी किंवा पैशासाठी, स्वार्थासाठी आणिक जाती-धर्मांच्या वर्चस्वासाठी चाललेला खेळ पहाता पहाता आजवर आपण जे शिकलो,वाचले,गुरुजनांनी जे संस्कार केले ते चुकीचे होते काय असे जेव्हा उद्विग्नपणे वाटू लागते तेव्हा मी खुर्चीतून अचानक उठून उभा राहतो आणि माणसांच्या या जंगलातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो. बेवड्याला जशी दारूची दुकाने माहिती असतात,ती दाखवावी लागत नाहीत तशी भटक्याला कुठे भटकायचे ते दाखवावे लागत नाही. एका भटक्याने  दिशा दिली देहरंगाची,निघालो मग त्या देह रंगात न्हावून निघायला....
     पनवेल शहर मायानगरी ,महानगरी मुंबईच्या शेजारी अंग चोरून कावरेबावरे होऊन बसलेल्या लहान मुलासारखे आहे. या शहराला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण.शहरापासून जेमतेम अर्धा तासाच्या अंतरावर असणारे. माथेरानच्या डोंगरात उगम पावणारी गाडी नदी.तिच्या तीरावर असणारे प्राचीन गाडेश्वराचे मंदिर.आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगा. धरणाला बिलगून अवखळ पोरागत बसलेला चंदेरी किल्ला. धरणाच्या पाण्यात पडलेले स्वतःचेच प्रतिबिंब विस्मय होऊन पहात असलेला चंदेरी. धरणावरून अधून-मधून धावणारा सांजवारा आणि देहरंगावरील त्याच्या हळुवार स्पर्शाने विस्कटत जाणारे आणि पुन्हा आकार धरू पाहणारे चंदेरीचे प्रतिरूप... पश्चिमेला, कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे भास्कररावांची अस्ताला जाण्याची घाई. त्यामुळे तिन्हीसांजेच्या वेळेस घरट्यात परतण्यासाठी पाखरांची चाललेली लगबग. मधेच आकाशात एका रेषेत शिस्तबद्धपणे उडत असलेले रान बगळे आणि हळूच चाणाक्षपणे ध्यानीमनी न येता पाण्यावर उतरून क्षणार्धात आपल्या चोचीत मासा गट्टम करणारे रान बगळे... धरणाच्या चारी बाजूला सह्याद्रीने जणू फेर मांडलाय. पूर्वेला पेबचा किल्ला उर्फ विकटगड. त्याच्या बाजूलाच एखाद्या मित्राप्रमाणे खांद्यावर हात ठेवून उभा असलेला माथेरानचा डोंगर.त्याच्या दक्षिणेला नावाप्रमाणेच प्रबळ असणारा प्रबळगड, एखादी प्रेयसी प्रियकराच्या खांद्यावर डोके ठेवून विसावलेली असते त्याप्रमाणे प्रबळगडला बिलगलेला कलावंतीणीचा सुळका, धरणात पाय सोडून बसलेला चंदेरी किल्ला आणि त्या पलिकडे उंचच उंच,मेघाना गुदगुल्या करण्यासाठी सरळसोट आकाशाला भिडलेला मलंगगड... थोड्या वेळाने भास्कराचे हे सखे सोयरे काळोखाच्या उदरात अंतर्धान पावल्यासारखे वाटतील. मग हळूहळू या पटलावर लुकलुकू लागतील काही चांदण्या, चंद्रोदय होत असल्याची भालदार-चोपदार वर्दी देतील, चंद्राचे चांदणे चौखूर उधळेल आणि हा परिसर पुन्हा एकदा न्हावून निघेल त्या शितल चांदण्यांनी... खरचं,ज्या कोणी या धरणाला देहरंग हे नाव दिले असेल तो किती तरी रसिक.सह्याद्रीचा हा गंध म्हणजे साक्षात शिवगंध आणि इथल्या मातीत रंगलेला देह म्हणजे देहरंग...साक्षात शिवाच्या पिंडीवरील  पवित्र भस्म. चित्रकाराला साद घालेल असा कॅनवास...
या जन्मावर,या जगण्यावर  शतदा प्रेम करावे हे कवी मंगेश पाडगावकर यांचे गीत आज प्रचिती देऊन गेले.... या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती,अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी.....

Comments